Gold Silver Prices Skyrocket : जागतिक राजकारणातील वाढता तणाव आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड खरेदीच्या हट्टापायी जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. याचे थेट पडसाद कमोडिटी बाजारात उमटले असून, बुधवारी सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात ५,००० रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याने १,५७,८७३ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला आहे.
चांदीचं त्रिशतक पार!
केवळ सोनेच नाही, तर चांदीनेही बुधवारी गुंतवणूकदारांना चकित केले. चांदीच्या दरात ३.१९ टक्क्यांची वाढ होऊन ती ३,३४,०१२ रुपये प्रति किलो या नव्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा कल आता वेगाने मौल्यवान धातूंकडे वळत आहे.
ट्रम्प यांची 'टॅरिफ' धमकी अन् जागतिक कलह
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याच्या आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. "जर करार झाला नाही, तर १ फेब्रुवारीपासून युरोपीय देशांवर १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावले जाईल," अशी तंबी ट्रम्प यांनी दिली आहे. जूनपर्यंत हे शुल्क २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या धमकीमुळे जागतिक व्यापारात मंदीची भीती निर्माण झाली असून सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात ४,८०० डॉलर्स प्रति औंसच्या पार गेले आहेत.
प्रमुख महानगरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति १ ग्रॅम)
'Goodreturns' च्या आकडेवारीनुसार, २१ जानेवारी रोजी विविध शहरांतील भाव खालीलप्रमाणे आहेत.
| शहर | २४ कॅरेट (₹) | २२ कॅरेट (₹) | १८ कॅरेट (₹) |
| मुंबई/पुणे | १५,४८० | १४,१९० | ११,६११ |
| दिल्ली | १५,४९५ | १४,२०५ | ११,६२६ |
| कोलकाता | १५,४८० | १४,१९० | ११,६११ |
| बेंगळुरू | १५,४८० | १४,१९० | ११,६११ |
| चेन्नई | १५,५४६ | १४,२५० | ११,८९० |
वाचा - पगार ५० हजार असो वा १ लाख; 'हा' एक फॉर्म्युला करेल कोट्यधीश; गुंतवणुकीचे 'सुपर हिट' गणित
ग्रीनलँडमध्ये युद्धाची भीती?
ग्रीनलँडच्या पंतप्रधानांनी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाईची शक्यता कमी असली, तरी मानसिकरीत्या तयार राहण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या राजकीय तणावामुळे शेअर बाजारातून पैसा काढून सोन्यात गुंतवण्याचे प्रमाण वाढले आहे.
